नाशिक : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे, भाजपाचे प्रा. कुणाल वाघ, सेना-रिपाइंकडून ललिता भालेराव आणि कॉँग्रेसचे राहुल दिवे या चौघांनी अर्ज दाखल केले आहेत. सत्ताधारी मनसेने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने स्थायी समितीच्या चाव्या आता राष्ट्रवादीच्या हाती जाणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून कॉँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असून, पदाधिकाऱ्यांमध्येही विसंवादाचे दर्शन घडले आहे. येत्या २४ मार्चला सभापतिपदासाठी निवडणूक होणार असून, सेना-भाजपानेही मनसे-राष्ट्रवादीला शह देण्याची तयारी चालविली आहे.महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी सकाळी ११ ते १ या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार सर्वप्रथम राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी चुंबळे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी चुंबळे यांचेसोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, गटनेत्या व विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याशिवाय कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, गटनेते उत्तमराव कांबळे उपस्थित होते. चुंबळे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यानंतर सेना-भाजपा-रिपाइंचे पदाधिकारी यांनी एकत्रित जाऊन शिवसेना-रिपाइंकडून रिपाइंच्या ललिता भालेराव यांनी, तर भाजपाकडून प्रा. कुणाल वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
स्थायीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हाती?
By admin | Updated: March 20, 2015 23:49 IST