दक्षता : आयमामध्ये झाली बैठकनाशिक : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सातपूर, अंबड परिसरातील औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात चोख पोलीस गस्त घालण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी उद्योजकांना दिले.दीपावलीनिमित्ताने औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना सुटी जाहीर करण्यात आल्याने दीपावलीपूर्व सुरक्षा व्यवस्थेबाबत निमा, आयमा व नाईसच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, सुरेश माळी, राजेंद्र आहिरे, मंगेश पाटणकर आदि उपस्थित होते. यावेळी जगन्नाथन यांच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने उपस्थित उद्योजकांनी विविध सूचना मांडल्या. पहाटेच्या दरम्यान चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढते, त्यामुळे सुरक्षाव्यवस्था पहाटे अधिक चोख करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तसेच दिवाळीपूर्व बोनसचे वाटप केले जात असल्याने औद्योगिक क्षेत्रातील अंधाराच्या साम्राज्याखाली असणाऱ्या रस्त्यांवर दबा धरून बसणाऱ्या चोरट्यांकडून मजुरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे बैठकीदरम्यान सुचविण्यात आले. सर्व सूचनांची नोंद घेऊन चोख सुरक्षाव्यवस्था औद्योगिक क्षेत्राला पुरविली जाणार असून, सातपूर, अंबड, गंगापूर पोलीस ठाण्यांना तसेच परिमंडळ दोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विविध सूचना देण्यात आल्याचे जगनाथन यांनी सांगितले. औद्योगिक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता, दर्जा याबाबत तपासणी करून चांगल्या गुणवत्तेचे कॅमेरे बसविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याची सूचना जगनाथन यांनी यावेळी उद्योजकांना केली. (प्रतिनिधी)
सुटीत औद्योगिक क्षेत्रात पोलिसांची विशेष गस्त
By admin | Updated: November 7, 2015 22:08 IST