नाशिक : श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार अर्थात मंगळागौरीचा मुहूर्त साधत सुवासिनींनी अनेक ठिकाणी मंगळागौरीची पूजा उत्साहात केली. रात्रीभर जागून मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळण्यात आले. नवीन लग्न झालेल्या सुना-लेकी तसेच लग्नाची पाच वर्ष झालेल्या सुवासिनींनी नटूनथटून, सालंकृत वेशभूषा करून मंगळागौरीची पूजा केली. मंगळागौरीसाठी सोळा पत्री, फळे-फुले, साग्रसंगीत पूजा साहित्य, नैवेद्य आदिंची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. बाजारात मंगळागौरीसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. आधुनिक जगतात वाटचाल करताना आणि डॉक्टर, इंजिनिअरपासून आयटी, संशोधकपर्यंत निरनिराळ्या पदांवर काम करणाऱ्या महिलाही मंगळागौरीसारख्या पारंपरिक पूजेला प्राधान्य देत असून, यथासांग पूजा करून त्या श्रद्धेसह पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोकामना करत आहेत. शहरात ठिकठिकाणी मंगळागौरीचे पूजन असल्याने पुरोहित वर्गाची दमछाक झाली. मंगळागौरीचे खेळ हा व्यायामाचा उत्तम मार्ग असल्याने महिलांना या खेळांचे विशेष आकर्षण दिसून येते. मंगळागौरीच्या खेळांमध्ये झिम्मा व फुगडी यांचा समावेश असतो. यात लाडू झिम्मा, निसर्ग झिम्मा, होडी हे प्रकार आवडीने खेळले जातात. मंगळागौरीचे खेळ सादर करणारे ग्रुपही तयार झाले असून, त्यांना खास मंगळागौरीच्या कार्यक्रमांमध्ये निमंत्रण देऊन बोलविले जात आहे. घरोघरी श्रावण महिन्यातील चार मंगळवारांपैकी सोयीनुसार एक मंगळवार निवडून पूजा केली जात आहे. (प्रतिनिधी)
सुवासिनींनी केले मंगळागौरीचे पूजन
By admin | Updated: August 10, 2016 00:36 IST