नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्यातील शासकीय मुद्देमालाच्या अपहार प्र्रकरणी गुन्हा दाखल असलेले सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर सुकलाल सोनवणे यांना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ या प्रकरणातील दुसरे संशयित सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक शरद बेंडकुळे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे़ सरकारवाडा पोलीस ठाण्यात २६ आॅक्टोबर २००५ ते २३ एप्रिल २००९ या कालावधीत सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद बेंडकुळे हे मुद्देमाल कारकून म्हणून काम पाहत होते़ त्यांच्यानंतर १७ आॅगस्ट २००९ ते २३ मे २०१२ पर्यंत शंकर सुकलाल सोनवणे (रा़ सिडको) हे मुद्देमाल कारकून होते़ या कालावधीत सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या शासकीय मुद्देमाल रजिस्टरवर १४ लाख ९८ हजार ७०५ रुपयांची नोंद होती़ मात्र, रजिस्टरवर नोंदणी केलेला हा मुद्देमाल आढळून न आल्याने हवालदार चंद्रकांत निकम यांनी या दोघांविरुद्ध मुद्देमालाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला होता़ (प्रतिनिधी)