पूर्व भागातील चांदगिरी, कालवी, हिंगणवेढे, जाखोरी, शिलापूर, लाखलगाव-गंगापाडळी, मोहगाव-बाभळेश्वर या सात ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची असली तरी शांततेत पार पडली. तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने यंदा अनेक ठिकाणी समझोता होऊन काही जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित जागांसाठी दोन पॅनेल समोरासमोर असल्याने सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. कालवी ग्रामपंचायतीत ७ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्याने तीन जागांसाठी दोन पॅनेलमध्ये लढत झाली. ज्ञानेश्वर अनवट, वाल्मिक अनवट, सुवर्णा अनवट, संगीता अनवट, शांताबाई अनवट, बंडु पारधी, सुनीता पवार हे सात उमेदवार विजयी झाले. येथील सरपंचपद ओबीसी राखीव झाल्याने ज्ञानेश्वर अनवट व संगीता अनवट हे दोन उमेदवार सरपंच पदाचे दावेदार आहेत.
हिंगणवेढेत भास्कर कराड व कृष्णा नागरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण पॅनेल निवडून आल्याने प्रस्थापितांना चांगलाच धक्का बसला. सरपंचपद ओबीसी राखीव झाल्याने पुरुषांमध्ये भास्कर कराड तर स्रियांमध्ये ज्योती नागरे हे दोन उमेदवार दावेदार आहेत. शिलापूरात ९ जागांसाठी दोन पॅनेलमध्ये अटीतटीची लढत होऊन परिवर्तन पॅनेलचे पाच तर नम्रता पॅनेलचे चार उमेदवार विजयी झाले. येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. परिवर्तन पॅनेलच्या विजयी उमेदवार मंदा गांगुर्डे या एकमेव उमेदवार या पदासाठी पात्र असल्याने, त्यांचे सरपंचपद निश्चित झाल्यात जमा आहे.
जाखोरीत ९ जागांसाठी दोन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. विश्वास कळमकर यांच्या नेत्तृत्वाखालील ग्रामसमृद्धी पॅनेलने पाच जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व सिध्द केले. येथील सरपंचपद सर्वसाधारण वर्गासाठी असल्याने पुरुषांसाठी विश्वास कळमकर व स्री जागेसाठी मंगला जगळे हे दोन उमेदवार दावेदार आहेत. लाखलगाव गंगापाडळी ग्रुपग्रामपंचायतीत एक जागा बिनविरोध झाली. १२ जागांंसाठी निवडणूक झाली. माजी सरपंच आत्माराम दाते, विकास जाधव यांच्या विकास पॅनेलने ११ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. येथील सरपंचपद ओबीसी राखीव असल्याने आत्माराम दाते व वैशाली अष्टेकर हे खऱ्या अर्थाने सरपंच पदाचे दावेदार आहेत. चांदगिरी ग्रामपंचायतीत सात जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली. सहा जागांसाठी निवडणूक झाली. माजी सरपंच रमेशभाऊ कटाळे यांच्या नेतृत्वाखालील श्रीविकास पॅनेलचे पाच उमेदवार विजयी झाले तर परिवर्तन पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले. येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने महेंद्र हांडगे हे एकमेव उमेदवार सरपंचपदासाठी निश्चित झाले आहेत.
मोहगाव, बाभळेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी पाच जागांसाठी मतदान झाले. सरपंचपद ओबीसीसाठी राखीव असल्याने या प्रवर्गातून निवडून आलेल्या एक पुरुष अथवा एक स्री यांची सरपंचपदासाठी वर्णी लागू शकते. या ठिकाणी सर्वसाधारण मधून निवडून आलेल्यापैकी काही जणांकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहे. तेही सरपंचपदासाठी इच्छुक असल्याचे समजते.