नाशिक : आर्थिक वर्षअखेरीस विवरणपत्र आणि कर भरण्यासाठी शेवटचा दिवस असलेल्या ३१ मार्च रोजी सर्व कामे आॅनलाइन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या करदात्यांना बॅँकांचे सर्व्हर डाउन झाल्याचा फटका बसल्याने त्यांची चलने स्वीकारण्यासाठी मध्यरात्री उशिरापर्यंत काही बॅँका सुरू होत्या. करदात्ये आणि करसल्लागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रांगा लावून तेथे चलने भरली.आर्थिक वर्षअखेर असलेल्या मार्च महिन्याचा शेवट हा टेन्शन वाढविणारा असल्याने अनेकांची ताळेबंद पूर्ण करण्यासाठी आणि विवरणपत्रे सादर करण्यासाठी धावपळ सुरू होती. ३१ मार्च हा आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस असतो. या दिवशी वर्षभरातील सर्व हिशेब पूर्ण करून त्यावर आधारित ताळेबंद तयार करायचे असते. जमा खर्चाचा हिशेब करून संस्थेची वाटचाल स्पष्ट करणारी नफा तोटा पत्रके याच कालावधीत बनविली जातात. त्यावर निघणारा कर भरण्याचा हा अखेरचा दिवस असतो. संस्थेचे ताळेबंदपत्रक सादर करण्यासाठी अर्थखात्याने आॅनलाइन व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विवरणपत्र भरण्यासाठी आयकर कार्यालयात होणारी गर्दी यंदा दिसली नाही. त्यामुळे आयकर खात्याचे काम आता मोठ्या प्रमाणात आॅनलाइन झाल्याचे त्यावरून दिसून आले, तर दुसरीकडे विवरणपत्र भरण्यापूर्वी आवश्यक असलेला आॅनलाइन कराचा भरणा करण्यासाठी सायंकाळी करदात्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अनेक बॅँकांचे सर्व्हर डाउन झाले होते.
मध्यरात्री उशिरापर्यंत काही बॅँका सुरू
By admin | Updated: April 1, 2015 01:41 IST