चांदवड : तालुक्यातील वाकी खुर्द येथील मूळ रहिवासी असलेले लष्करी जवान शहाजी गोरडे (३४) यांचे जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना निधन झाले.जम्मू येथील आर. आर. २६ मध्ये ते कार्यरत होते. काश्मीर येथील ब्रांदीपुरा जिल्ह्यात १२ हजार मीटर उंचीवर पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांनादेखील याबाबत काहीही माहिती नव्हती. त्यांच्या पश्चात आई जनाबाई (६२), वडील गोपाळा निंबाजी गोरडे (६५), पत्नी रेखा (२८), मुलगी सिद्धी (८), मुलगा ओम (६) व दोन भाऊ असा परिवार आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, सैन्य दलाने मृत्यूच्या कारणाबाबत अधिकृत माहिती दिली नसल्याने त्याबाबत काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. गोरडे यांचा मृतदेह रविवारी रात्री उशिरापर्यंत देवळाली कॅम्प येथे दाखल होईल. त्यानंतर वाकी खुर्द येथे सोमवारी सकाळी १० वाजता लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती खेडकर यांनी दिली. दरम्यान, आमच्या देवळाली कॅम्प येथील प्रतिनिधीने लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जवानाचा मृत्यू झाला इतकीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
वाकी खुर्द येथील सैनिकाचे जम्मू-काश्मीरमध्ये निधन
By admin | Updated: September 12, 2016 02:01 IST