लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नीतिमूल्यांची जपणूक करीत त्यावर आधारित शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून समाजात परिवर्तन घडवून आणणे हे शिक्षण पद्धतीचे अंतिम ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आगामी काळात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर शैक्षणिक विकासासाठी करायला हवा, असे प्रतिपादन विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा वर्धापन दिन विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात शनिवारी साजरा करण्यात आला. डॉ. ताकवले म्हणाले, एकविसाव्या शतकात सर्वसामान्यांचे लोकविद्यापीठ झाले पाहिजे, यासाठी आपण आग्रही आहे. डिजिटल क्रांतीमुळे समाजजीवनाशी संबंधित सर्व घटकांप्रमाणेच शिक्षणक्षेत्रामध्येही सकारात्मक बदल झाल्याचे जाणवत आहे. गरजांवर आधारित नवीन शिक्षण घेण्याची व अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची सुविधाही तंत्रज्ञान आधारित अशा दूरशिक्षण प्रणालीद्वारे उपलब्ध झाली आहे, असे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन म्हणाले.
समाज परिवर्तन हेच शिक्षणाचे ध्येय असावे
By admin | Updated: July 2, 2017 03:36 IST