नाशिक : रोजच्या प्रमाणेच कुटुंबातील प्रत्येकाची सकाळ उगवली. कुणाला कामावर जाण्याची घाई, तर कुणाला कॉलेजला जाण्याची. सकाळचे स्नान उरकून जो-तो आपल्या कामात व्यस्त असतानाच स्नानगृहातील दगडाखाली नागाचे दर्शन घडले आणि सर्वांचीच पाचावरधारण बसली. पंचवटी परिसरातील हॉटेल जत्रामागील श्रमनगरमध्ये सुनीता भालेराव यांच्या घरात सदर धक्कादायक प्रकार घडला. सुनीता यांच्या घरात छोटेचे बाथरूम आहे. त्यामध्ये पाण्याची भांडी आणि बसण्यासाठी एक दगड ठेवण्यात आलेला आहे. सकाळच्या गडबडीत सुनीता यांचे पती, कन्या आणि मुलानेही आंघोळ उरकली. मुलगी कॉलेजला निघून गेली, तर पती ड्युटीवर गेले. काही वेळानंतर बाथरूममधून फुत्कारण्याचा आवाज आल्याने सुनीता यांनी अंदाज घेण्याचा प्रयत्न करताच नागाने फना उगारला. नागाला पाहून सुनीता या घाबरून गेल्या, नागाला पाहून त्या जोरात किंचाळल्याने आजूबाजूचे लोक धाऊन आले. ज्या दगडाखालून नागाने फना बाहेर काढला तेथेच आपण आंघोळी उरकल्या या कल्पनेनेच सुनीता यांची जवळजवळ शुद्धच हरपली होती. काही वेळानंतर सर्पमित्र माणिक कुमावत यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी बाथरूमधून नागाला बाहेर काढले. बाथरूमधून पाच फुटी नाग बाहेर काढल्यानंतर दैवबलवत्तर म्हणून भालेराव कुटुंबीय बचावले अशीच प्रतिक्रिया परिसरातून उमटली. बाथरूमध्ये नाग कसा घुसला, कुठून आला याविषयीची चर्चा परिसरात सुरू होती. चार जणांच्या आंघोळी उरकल्यानंतरही नाग तेथेच दडून कसा राहिला अशा अनेक प्रश्नांचे काहूर कायम आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणूनच भालेराव कुटुंबीय बचावले.
दगडाखाली नाग, त्याच्यावरच स्नान
By admin | Updated: September 12, 2016 01:31 IST