गावठाणात खोदून ठेवलेले रस्ते आणि त्यात त्यांची खोली वाढवल्याने संभाव्य पुराचा धोका वाढणार असल्याची तक्रार होती. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या हाेत्याच, पंरतु लोकमतनेही हा विषय लावून धरला. त्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष गावठाणातील स्थिती बघितली. त्यावेळीच कंपनीचा कारभार त्यांच्या लक्षात आला होता. रस्त्यांच्या सदोष डिझाइनविषयी यावेळी त्यांनी झाडाझाडती घेतली होती. तसेच महापालिकेत बैठक घेण्यात येईल, असे सांगितले हेाते. त्यानुसार कंपनीचे सीइओ सुमंत मोरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (दि.२२) घेतली.
गावठाणा भागात नऊ मीटर रुंद रस्ते गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात रस्ते चार ते साडेचार मीटर रस्तेच जागेवर आहेत, तेथे रस्ते खोदून डक्ट करता येणार नाही की पदपथही शक्य नाही त्यामुळे अशाप्रकारचे रस्ते करून काय उपयोग? असा प्रश्न जाधव यांनी केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष गावठाण भागात रस्ते बघावे आणि त्यानुसार रस्त्यांचे डिझाइन तयार करणे शक्य आहे का बघावे अन्यथा गावठाणातील असे रस्ते सोडून अन्य भागांत रस्ते तयार करावेत किंवा अन्य प्रकल्प हाती घ्यावेत, असा निर्वाणीचा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.
इन्फो..
एमजीरोड फोडण्याची गरज नाही
महात्मा गांधीरोड अत्यंत चांगला असल्याने तो फोडला जाणार नसला तरी त्याच्या साइडपट्ट्या खोदून सर्व्हिस लाइन्स टाकणे तसेच पदपथ करण्याचे नियोजन आहे, मात्र त्याचीही पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच गावठाणात महापालिकेचे पोल चांगले असतील स्मार्ट सिटी कंपनीने अकारण पोल बसवू नये त्याऐवजी शहरातील अन्य गावठाण भागात ते गरजेनुसार लावावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.