सिन्नर : दिवाळी सणामुळे जोडून आलेल्या सुट्ट्यांचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, सिन्नर तालुक्यात चार वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत सहा जण ठार झाले आहेत.पांगरी गावाजवळ सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या दुभाजकावर दुचाकी चढल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) पहाटे घडली.मुंबई येथील रोहीत घाडगे व सुरेश रमेश बागुस्ते (१८) हे दोघे शिर्डीला दर्शनासाठी चालले होते. त्याची मोटारसायकल बजाज पल्सर दुभाजकावर चढल्याने तोल जाऊन ते दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात जखमी झालेल्या रोहीत व सुरेशया दोघांनाही सिन्नर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सुरेश याची प्राणज्योती मालवली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.घोरवड शिवारात कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठारसिन्नर-घोटी मार्गावर घोरवड येथील साईउत्सव ढाब्याजवळ दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी (दि.२६) दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. आतिष सुरेश पाटील रा. भार्इंदर वेस्ट हे बजाज पल्सर मोटारसायकलने शिर्डी येथे दर्शन करुन मुंबईकडे चालले होते. यावेळी समोरुन येणारी मारुती स्विफ्ट (एम. एच. ०२, सी. एच. ५९०६) कार व पाटील यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जखमी झालेले पाटील व त्यांच्या मागे बसलेली महिला (नाव समजू शकले नाही.) यांना उपचारासाठी नाशिकरोड येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पाटील यांचा मृत्यू झाला. पंचाळे-देवपूर रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत दोघे ठारपंचाळे-देवपूर रस्त्यावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण ठार झाले. शनिवारी (दि. २५) दुपारी बारा वाजेच्या सूमारास हा अपघात घडला.देवपूरकडे जात असलेले संतोष काशिनाथ चाबुकस्वार (२९) रा. गंगापूर, जि. औरंगाबाद यांची बजाज डिस्कव्हर (क्र. एम. एच. १७, ए. व्ही. ८७७०) व देवपूरहून पंचाळेकडे येत असलेल्या दत्तू माधव हांडोरे (३२) रा. शिंदेवाडी ता. सिन्नर यांची बजाज प्लॅटीना (एम. एच. १५, इ. सी. ५९४१) या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात संतोष व दत्तू हे दोघेही ठार झाले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
सिन्नर : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रहदारीत वाढ झाल्याने चार अपघातांत सहा ठार
By admin | Updated: October 26, 2014 22:39 IST