चाडेगाव : ‘प्रस्तावित ६६० मेगावॅट प्रकल्प झालाच पाहिजे, प्रकल्प आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणा देत सिद्धार्थनगर परिसरातील नागरिक व संघर्ष समिती सदस्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर प्रा. जोगेंद्र कवाडे, गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. गत सहा वर्षांपासून एकलहरे येथील प्रस्तावित ६६० मेगावॅटचा प्रकल्प परवानग्यांच्या फेऱ्यात गटांगळ्या खात असून, जुने संच केव्हाही बंद करण्याचा फतवा प्रशासन काढू शकते. यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी मोर्चा काढून निदर्शने केली. प्रा. कवाडे यावेळी बोलताना म्हणाले की, देशातील अव्वल चालणारे संच उत्तम रितीने निर्मिती सुरू असताना सत्ताधारी पक्ष जाणूनबुजून बंद पाडण्याचे कारस्थान करीत आहे. रेल्वे, पाणी, जागा आदि सर्व सुविधा उपलब्ध असताना खासगी प्रकल्पांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ६६० प्रकल्प लवकरात लवकर मार्गी कसा लागेल यासाठी आपण प्रयत्न करणार असून, शासनानेही लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम मार्गी लावावे. यावेळी संजय जाधव, प्रदीप वीर, प्रवीण पगारे, संदीप यशोद, दीपक सोनवणे, बाळू साळवे, बंटी सुरसाळवे, सुधीर पगारे, सचिन सोनवणे, राहुल सोनवणे, अनिल म्हस्के, बापू पवार, अनिल चव्हाण, विशाल सोनवणे, करण भालेराव आदिंसह नागरिक व समिती सदस्य उपस्थित होते. यापूर्वी नाशिकरोड येथेही नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन प्रकल्पाच्या मागणीसाठी केले होते. (वार्ताहर)
सिद्धार्थनगर संघर्ष समितीचा मोर्चा
By admin | Updated: December 21, 2015 23:26 IST