निफाड : तालुक्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच असून, सोमवारी सायखेडा येथे बिबट्याने शेतात काम करणाऱ्या कैलास दत्तात्रय कुटे या शेतकऱ्यावर हल्ला करून त्यास जबर जखमी केल्याची घटना घडली. यामुळे गंगाथडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सायखेडा येथील कैलास दत्तात्रय कुटे (२८) हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सायखेडा येथील मदारी रस्ता भागातील शेतात गेले होते. दुपारी २.३०च्या सुमारास कुटे शेतात काम करत असताना उसाच्या शेतातून अचानक बाहेर येत कुटे यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केल्याने कुटे घाबरले व त्यांनी आरडाओरडा केला. या हल्ल्यात ते बेशुध्द होऊन जबर जखमी झाले. त्यानंतर आजूबाजूचे कामगार व नातेवाईक तात्काळ धावून आले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कुटे यांना नाशिकला पाठवले. कुटे यांच्या पाठीवर व बरगडीच्या भागावर बिबट्याने गंभीर जखमा केल्या. सायखेड्याच्या सरपंच सुजाता कातकाडे यांनी तातडीने वनविभाग व सायखेडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. येवला वनविभागाचे परिमंडल ैअधिकारी, टी. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.व्ही. सहाणे, पगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटे यांच्या शेताजवळ पिंजरा लावला. बिबट्याने ८ आॅगस्टला शिंगवे दीपाली कोठे या बालिकेचा बळी घेतला. १२ आॅगस्टला याच गावातील बैलगाडीतून जाणाऱ्या शिंदे यांच्या बिबट्याने हल्ला केला. (वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात सायखेड्याचा शेतकरी जखमी
By admin | Updated: August 25, 2015 00:07 IST