पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय, जय सीता राम सीता’ असा जयघोष करीत व ढोल ताशांच्या गजरात सुवर्णलंकाराची मिरवणूक काढून श्री काळाराम मंदिरात राम, सीता व लक्ष्मणाला तब्बल ३१ तोळे सोन्याच्या वजनाच्या दागिन्यांचे सुवर्णलंकार प्रदान करण्यात आले. या सुवर्ण अलंकारांनी श्रीराम मूर्ती अधिकच झळाळली.रामनामाचा गजर व ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या सुवर्णलंकार प्रदान मिरवणुकीत भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झालेले होते. सकाळी श्री काळाराम संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यालयापासून मंदिराच्या आवारात सुवर्णलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयजयकाराने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर मंदिरात चार तास पूजा विधी करण्यात आल्यानंतर रामाची आरती करून प्रभू श्रीरामांना १० तोळ्याचा, लक्ष्मणाला १०, तर सीतेला ११ तोळ्याचा अशा ३१ तोळ्याच्या दागिन्यांचे सुवर्णलंकार प्रदान करण्यात आले. (वार्ताहर)
सुवर्ण अलंकाराने झळाळली श्रीराम मूर्ती
By admin | Updated: November 25, 2015 23:37 IST