नाशिक (प्रतिनिधी)- इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान हिंदी विषयाच्या सुमारे दिडशे प्रश्नपत्रिका कमी पडल्याने परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील बी. डी. भालेकर आणि सातपूर येथील एका केंद्रामधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिकाच शिल्लक राहिली नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढून वेळ मारून नेण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी नेमकी चूक कुठे झाली याचा अहवाल राज्य मंडळाने नाशिक विभागाकडे मागितला असल्याचे समजते. इयत्ता दहावीचा आज हिंदी या विषयाचा पेपर होता. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाटपाचे काम सुरू असताना नाशिक कस्टडी क्रमांक एकमधील बी. डी. भालेकर आणि सातपूर विद्यालयातील परीक्षा केंद्रातील काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या, तर काहींना मिळाल्याच नाही. त्यामुळे केंद्र संचालकांची चांगलीच धावपळ झाली. सुमारे दिडशे विद्यार्थी प्रश्नपत्रिकेविना वर्गात बसून होते. या केंद्रांवर ज्या प्रश्नत्रिकेचा गठ्ठा फोडण्यात आला त्यामध्ये हिंदी भाषा विषयाऐवजी संयुक्त हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका निघाल्याने हा सारा गोंधळ झाला.
हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा तुटवडा
By admin | Updated: March 6, 2015 00:44 IST