नाशिक : प्रवाशांना मशीनच्या माध्यमातून तिकिटे दिली जात असली तरी इमर्जन्सी म्हणून देण्यात येणाऱ्या कागदी तिकिटांचा तुटवडा निर्माण झाल्याचे अडचण वाढण्याची शक्यता आहे. पाच रुपये तसेच लगेज तिकिटांची छपाईच विलंबाने सुरू झाल्याने जिल्ह्याला या तिकिटांचा तुटवडा भासत आहे. वाहकांनी पाच रुपयांच्या तिकिटाची मागणी नोंदविली असताना त्यांना अद्यापही तिकीट मिळत नसल्याची तक्रार आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळाला वाहतूक सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, अडचणींचा प्रवास अजूनही संपत नाही. शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेली नाही. अजूनही प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने उत्पन्नातील घट कायम आहे. मध्यंतरी ईटीआयएम मशीनच्या लिंकिंगची मुदत संपल्याने अडचणीत अधिक भर पडली होती. आता पर्यायी व्यवस्था म्हणून देण्यात येणाऱ्या कागदी तिकिटांचा तुटवडा भासू लागला आहे.
महामंडळातील वाहकांना ईटीआयएम मशिन्स देण्यात आले असले तरी २००९ च्या शासन निर्णयानुसार तांत्रिक अडचणीच्या काळात पूर्वीप्रमाणेच कागदी तिकिटांचा ट्रेदेखील दिला जातो. त्यामुळे वाहकाकडे ईटीआयएम मशीन आणि कागदी तिकिटांचा ट्रेदेखील असताे. तिकिटांच्या दरानुसार वाहक तिकिटांची मागणी नोंदवत असतात. मात्र, मागणी नोंदवूनही पाच रुपयांच्या दरातील तिकीट नसल्याने अनेकदा अडचणी येत आहेत.
शहरासाठी १ ते १० रुपये दरातील तिकिटे उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी १० ते १०० रुपयांच्या दरातील तिकिटेेदेखील उपलब्ध आहेत; परंतु टप्पा तिकीट आकारताना अनेकदा पाच रुपयांच्या तिकिटाची गरज भासते. हे तिकीटच मिळत नसल्याचे साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या तिकिटांची अडचण येऊ शकते. ईटीआयएम मशीन सुरळीत आणि सुस्थितीत असेल तोवर ठीक मात्र यंत्रात तांत्रिक बिघाड किंवा नेटवर्कची अडचण असल्यास ऐनवेळी वाहकाची गैरसोय होऊ शकते. यातून त्याच्यावर आर्थिक गणित जुळविण्याचे संकट येण्याची शक्यता आहे.
--इन्फो--
छपाईला विलंब
मुंबईतील मुख्यालयातून विभागांना मागणीनुसार तिकिटे पाठविली जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे छपाई बंद असल्याने पाच रुपयांच्या दरातील तिकिटांची छपाई थांबली होती. आता छपाई सुरू झाल्याने मागणी केल्यानुसार तिकिटे उपलब्ध होऊ शकणार आहेत. अनेक विभागांकडे इतर दरांची तिकिटे शिल्लक आहेत. मात्र, पाच रुपयांची तिकिटे प्राधान्याने लागत असल्याने नेमका याच तिकीट दराचा तुटवडा निर्माण झाला आहे.