नाशिक : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपा आणि सेना स्वबळाची भाषा करीत आहेत आणि तशी चाचपणीही करीत आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सेनेच्या वाटेला असलेल्या विधासभा मतदारसंघांबरोबरच भाजपाच्या मतदारसंघांतील तयारीचा आणि इच्छुकांचाही आढावा घेतला. त्यामुळे महायुतीनेच निवडणुकीला सामोरे जायचे ठरले, तर किमान काही मतदारसंघांमध्ये भाजपा सेनेत अदलाबदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेला घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी दोन्ही पक्षांची जय्यत तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळाच्या चर्चाही सुरू केल्या. त्यामुळे गुरुवारी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्णांतील तब्बल ३५ मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, रामदास कदम, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी विभागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून चाचपणी केली. उत्तर महाराष्ट्रात ३५ जागा असून, प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची सभासद नोंदणी झाली. मतदारसंघात गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काय स्थिती होती, गेल्या महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या जागा, मतदान अशी माहिती घेण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत कोण कोण इच्छुक आहेत त्यांची नावे विचारण्यात आली. त्याचबरोबर भाजपाच्या मतदारसंघांत कोण कोण इच्छुक आहेत, तेथे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत याचाही आढावा घेण्यात आला. त्यानुसार अनेक इच्छुकांनी भाजपाच्या ताब्यातील जागा परत घेण्याची मागणी केली आहे. सर्व बाबींची नोंद घेण्यात आल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.एकमत झाले तरच भाजपाकडून जागा घेणारशिवसेनेने उत्तर महाराष्ट्रातील ३५ मतदारसंघांतीलच इच्छुकांची चाचपणी करून स्वबळाचे संकेत दिले आहेत; परंतु दुसरीकडे युती झाल्यास भाजपाच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागा मिळविण्याचीही तयारी आहे. त्यामुळे सध्या भाजपाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांतील एकापेक्षा अधिक इच्छुकांना उद्धव ठाकरे यांनी, सर्वांनी एकत्र बसून एकच नाव सांगा, अन्यथा तोंडावर पडण्याची वेळ येईल, असे बजावल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेने केली स्वबळाची चाचपणी
By admin | Updated: July 25, 2014 00:36 IST