नाशिक : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य राजकीय पक्षांनी निवडणूक लढवावी की नाही, याबाबत तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेनेने भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी उमेदवार उभे करण्याची चाचपणी सुरू केल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात दोन महिन्यांपूर्वीच अन्य पक्षांतील उमेदवारालाच ‘गळास’ लावण्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा व माकपच्या वतीने उमेदवारी निश्चित झालेली असताना तिकडे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी गृहीत धरून प्रचारास सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यातील चांदोरी-सायखेडा भागात त्यांनी भेटी दिल्याचे समजते. तर गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करियर विभागाचे काम पाहणारे संदीप चव्हाण यांनी आठ महिन्यांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघातील काही जिल्ह्यांचा दौरा यापूर्वीच केला असून, त्यांनाही मनसेकडून उमेदवाराची अपेक्षा आहे. तूर्तास महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेची वाटचाल सुरू असल्याने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मनसेकडून फारसा उत्साह दाखविण्यात आलेला नाही. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरच मनसेकडून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामानाने पदवीधरांची नोंदणी करून पाचही जिल्ह्यात प्रचाराचे जाळे निर्माण करू शकणाऱ्या उमेदवाराचा शिवसेनेकडून शोध सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
शिवसेना, मनसेचे तळ्यात-मळ्यात?
By admin | Updated: August 18, 2016 00:45 IST