सिडको : अंबड येथील शिवतेज कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी गणेश उत्सव पाठोपाठ येणारा नवरात्र उत्सवात होणारा खर्च न करता महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त व आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात म्हणून दोन लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे मंडळाचे मुख्य प्रवर्तक व शिवसेनेचे महानगर समन्वयक दिलीप दातीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.अंबड येथील शिवतेज, कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक मित्रमंडळ वर्षभर रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याबरोबरच दरवर्षी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. परंतु यंदाच्या वर्षी मात्र गणेशोत्सवा पाठोपाठ येणाऱ्या नवरात्र उत्सवात होणारा खर्च न करता महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त व आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात म्हणून दोन लाख रुपयांचा निधी मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. सदर जमा करण्यात आलेला निधी हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे दातीर यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शरद गायधनी, सचिव अॅड. दीपक ढिकले, उपाध्यक्ष बाळासाहेब कोरडे, खजिनदार ज्ञानेश्वर मोरे, सहसचिव संतोष नागरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवतेज मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांना दोन लाख
By admin | Updated: October 10, 2015 22:34 IST