निफाड : आकाशातून पडणाऱ्या विजेचा थरार शनिवारी निफाड तालुक्यातील श्ािंगवे येथील ग्रामस्थांनी अनुभवला. शिंगवे गावातील सुतार सानप गल्लीतील घरावर वीज पडून घरात झोपलेले माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाळू देवराम मोगल (५९) हे जागीच ठार झाले. वीज पडल्याने गावाजवळील विद्युत रोहित्राचा स्फोट झाला, तर एका वस्तीजवळील नारळाचे झाड जळून खाक झाले. मयत वाळू मोगल निफाडच्या राजकारणात वाळूअप्पा नावाने परिचित होते. त्यांचे शिंगवे गावात घर आहे. शेजारीच त्यांचे चुलत बंधू दौलत पांडुरंग मोगल यांचेही घर आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाळूअप्पा त्यांच्या घराच्या माडीवर झोपलेले होते. पावसाचे वातावरण तयार झाले होते. अचानक ढगांचा गडगडाट होऊन वीज त्यांचा घराला जोडून असलेल्या दौलत मोगल यांच्या घरावर वीज कोसळली. यात घरातील वीज मीटर, अडगळीतील लाकडे जळून खाक झाली. दौलत मोगल यांच्या घरातून पुढे जात विजेने वाळू मोगल यांच्या घराच्या भिंतीला खिंडार पाडले. वायुवेगाने जाणाऱ्या विजेचा वाळू मोगल यांना धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतक्यावरच न थांबता सुतार सानप गल्लीतून विजेच्या ज्वालाचे लोळ २०० मीटरपर्यंत पसरले. विजेच्या धक्क्याने गावाच्या प्रवेशव्दारावरचे नारळाचे झाड जळून खाक झाले. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यामुळे अनेकांच्या घरातील विद्युत साहित्य जळाले.वाळू मोगल यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे. मोगल यांच्या घरावर वीज पडली त्यावेळी गावात विजेचे भारनियमन होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर गावात रात्री उशिरापर्यंत विद्युतपुरवठा सुरू झालेला नव्हता. निफाड शहर व परिसरातील गावात सर्वत्र सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी सोंगणी केलेल्या सोयाबीन पिकाचे वीज पडल्याने नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
शिंगवेकरांनी अनुभवला विजेचा थरार
By admin | Updated: October 4, 2015 00:16 IST