नाशिक : राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी अशोक सावंत यांच्या नावाची चर्चा पुढे येताच राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे व प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांची या पदावर वर्णी लावावी, यासाठी पक्षांतर्गत गट सक्रिय झाले असून, शनिवारी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसने विधान परिषद सदस्यत्वासाठी जी यादी तयार केली त्यात अशोक सावंत यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा सुरू होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. त्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, भुजबळ विरोधक गजानन शेलार यांचाही समावेश होता. सावंत यांचे पक्ष संघटनेत काहीच योगदान नसताना त्यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची बाब राष्ट्रवादीच्या अनेक नेते, कार्यकर्त्यांना खटकली व त्यातून विरोध सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सावंत हे मुंबईत तळ ठोकून असून, त्यांच्या नावाला विरोध करणारा राष्ट्रवादीचा एक गटही सक्रिय झाला आहे. त्यातूनच श्रीराम शेटे, सुनील बागुल यांची या पदावर वर्णी लावावी, अशी मागणी करण्यासाठी शनिवारी सकाळी शिष्टमंडळाने भुजबळ फार्म येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यात आजवर पक्षाचे केलेले काम व निभावलेली जबाबदारी याची माहिती भुजबळ यांना या शिष्टमंडळाने दिली. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी विधान परिषदेवर सर्वमान्य व्यक्तींची निवड केली जावी, असेही सांगण्यात आले. यावर भुजबळ यांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहोचवू, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
शेटे, बागुल समर्थकही सरसावले विधान परिषद : सावंत यांना वाढता विरोध
By admin | Updated: June 1, 2014 00:57 IST