नाशिक : शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक महापालिका गेल्या आठ वर्षांपासून खासगी ठेकेदारामार्फत लाखो रुपये खर्चुन निर्बीजीकरणाची मोहीम राबवित आहे. परंतु दरवर्षी सुमारे आठ हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येऊनही भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येत घट झालेली नाही. उलट त्यात वाढच होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहाची संकल्पना मांडली असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.नाशिक महापालिकेमार्फत सन २००७ पासून भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी दरवर्षी ठेका काढला जाऊन त्यावर सुमारे ७५ लाख रुपये खर्च केले जात आहेत. एका भटक्या कुत्र्यामागे ठेकेदाराला सुमारे ९०० रुपये मोजावे लागतात. त्यात भटके कुत्रे पकडणे, त्याच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करणे, तीन दिवस त्याचा पाहुणचार करणे यासाठी खर्च करावा लागतो. सन २००७ ते २०१० या कालावधीत १४ हजार ५७५ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली तर गेल्या चार वर्षांपासून सुमारे ७ ते ८ हजार भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या संख्येत काहीही फरक पडलेला दिसून येत नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांकरीता निवारागृहाची संकल्पना मांडली आहे. महापालिकेच्याच एखाद्या भूखंडावर भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृह उभारता येईल. त्यात शहरातील निर्बीजीकरण झालेली कुत्री ठेवण्यात येतील. सध्या शहरातील हॉटेल्स, मंगलकार्यालये तसेच रहिवाशी भागांतून घंटागाडीच्या माध्यमातून जे टाकून दिलेले खाद्यान्न आहे, त्याचा वापर या भटक्या कुत्र्यांसाठी करता येऊ शकेल. या निवारागृहासाठी कुणी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या माध्यमातूनही ही संकल्पना राबवता येऊ शकेल. या निवारागृहामुळे निर्बीजीकरण झालेली भटकी कुत्री एका ठिकाणी ठेवण्यात आल्याने गोंधळ कमी होणार असून निर्बीजीकरण न झालेली कुत्री शोधणे सहज सुलभ होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तो आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. बुकाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृह
By admin | Updated: January 16, 2015 23:37 IST