सांगली : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नाशिकला जिल्हाधिकारीपदी बदली झाल्याने गेले महिनाभर सांगलीचे जिल्हाधिकारीपद रिक्त होते. शेखर गायकवाड यांच्या बदलीचे आदेश बुधवारी त्यांना मिळाले. ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेली अडीच वर्षे ते कार्यरत होते. बदलीचे आदेश बुधवारीच मिळाले असून, १६ मार्चला सांगलीचा पदभार स्वीकारू, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शेखर गायकवाड भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून, १९८७ मध्ये त्यांनी कोल्हापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर १९८९ ते ९१ पर्यंत त्यांनी तेथेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम केले. १९९१ ते १९९४ पर्यंत त्यांनी सोलापूरच्या प्रांताधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला. १९९४ ते ९५ दरम्यान ते सोलापूरला जिल्हा पुरवठा अधिकारी होते. १९९५ ते २००५ दरम्यान हवेलीचे प्रांताधिकारी, मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहायक, मंत्रालयात मंत्र्यांचे खासगी सचिव, जीवन प्राधिकरण (मुंबई)येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००५ मध्ये त्यांची नियुक्ती नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून झाली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांनी २०१० ते २०१३ दरम्यान सहसचिव म्हणून काम केले. २०१३ पासून ते ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. गायकवाड यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवीसह समाजशास्त्र, मानसशास्त्र विषयांत एम. ए. केले असून, एलएल.बी.चे शिक्षणही पूर्ण केले आहे. शेती, स्वस्त धान्य पुरवठा, महसूल, आदी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. (प्रतिनिधी)
शेखर गायकवाड सांगलीचे नवे जिल्हाधिकारी
By admin | Updated: March 5, 2015 00:15 IST