नाशिक : वाणिज्य शाखेच्या पद्व्युत्तर पदवीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये बीवायके महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रशासनाच्या घोळामुळे अनुत्तीर्ण दर्शविले आहे. प्रशासन आपली चूक सुधारण्यास स्पष्ट नकार देत असल्याने या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. वाणिज्य शाखेच्या पद्व्युत्तर पदवीच्या तिसऱ्या सेमिस्टरचा निकाल जाहीर झाला. यात बीवायके महाविद्यालयाच्या ‘बिझनेस फायनान्स आणि रिसर्च मेथडॉलॉजी फॉर बिझनेस’ या दोन विषयांमध्ये विद्यार्थ्यांना गैरहजर दर्शविले. वास्तविक प्रत्यक्ष परीक्षा देताना हे विद्यार्थी हजर असल्याने गुणपत्रिकेत गैरहजर असल्याचा शेरा बघितल्याने या विद्यार्थ्यांना धक्काच बसला. त्यांनी याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे जाब विचारला असता, त्यांनी आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या निकालामध्ये या दोन्ही विषयांचे गुण दर्शविले जाणार असल्याचे गुडगुडीत उत्तर दिले; परंतु यामुळे या सातही विद्यार्थ्यांवर अनुत्तीर्ण झाल्याचा ठपका पडणार असल्याने त्यांनी तातडीने सुधारित गुणपत्रिका दिली जावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.दरम्यान, महाविद्यालयाने नकाराची मालिका चालूच ठेवल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठात याबाबत रितसर तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)
महाविद्यालयाच्या घोळामुळे सात विद्यार्थी अनुत्तीर्ण
By admin | Updated: July 31, 2015 23:52 IST