नाशिक : एक जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणाऱ्या रेशन दुकानदारांचा धीर सुटत चालला असून, जिल्ह्यातील सातशे दुकानदारांनी धान्य उचलण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पैशांचा भरणाही केल्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये फूट पडल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे ज्या दुकानदारांनी धान्य उचलले नाही अशांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी एक जानेवारीपासून रेशन दुकानदार महासंघाने धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दरमहा ३५ हजार रुपये मानधन मिळावे, घासलेटचा कोटा पूर्ववत करावा, आधार कार्ड क्रमांक गोळा करण्याची सक्ती करू नये आदि मागण्यांसाठी रेशन दुकानदार बेमुदत संपावर उतरले आहेत. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या संपात फूट पडली असून, काही दुकानदारांनी धान्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही दुकानदारांनी चलने भरून धान्याची मागणी केली आहे. जवळपास सातशे दुकानदारांनी चलने भरल्याची माहिती पुरवठा खात्याकडून दिली गेली असून, फक्त नाशिक शहर व नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदार मात्र ठाम आहेत. त्यामुळे ज्या दुकानदारांनी जानेवारीचे धान्य उचलण्यास नकार दिला त्यांची दुकाने निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा कार्यालयाने सर्व तहसीलदारांना दिले आहेत. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी रेशन दुकानदार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण केले असून, त्यात काय तोडगा निघतो याकडे दुकानदारांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)
सातशे रेशन दुकानदारांनी भरले चलन
By admin | Updated: January 11, 2017 00:36 IST