सिन्नर : आयुष्यभर सांभाळलेली संसाराची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत खेळत जावे, यासाठी येथील लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी व भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आनंदमेळ्यात ज्येष्ठांनी वय विसरुन वेगळीच धमाल उडवून दिली. निसर्गरम्य ढग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तळ्यातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी सहल, वनभोजन व विविध स्पर्धा असा परिपूर्ण ‘आनंदमेळा’ अनुभवला.शुक्रवारी दुपारी बारा वाजता ज्येष्ठ नागरिक आपल्या शिदोऱ्या घेऊन मोठ्या संख्येने तळ्यातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात जमा झाले होते. प्रसन्न वातावरणात त्र्यंबकबाबा भगत यांनी गायलेल्या ‘सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला’ या भजनाने आनंदमेळ्यास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुषांच्या संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तळ्यात-मळ्यात, बादलीत बॉल टाकणे, बाटलीवर रिंग टाकणे, बंद पिशव्यांमधील धान्य व मसाल्याचे पदार्थ ओळखणे, एका गुलकाडीने जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटविणे, अर्ध्या मिनिटात तांदळातील डाळ निवडणे, लसूण सोलणे, डोळे बांधून चित्रातील बाईच्या कपाळावर टिकली लावणे, डोळे बांधून कुंडीत रोप लावणे आदि गमतीदार स्पर्धा उत्साहात पार पडल्या. हरलेल्या-जिंकलेल्या व केवळ प्रेक्षक असलेल्यांनी वय विसरुन आनंदाने उड्या मारल्या. ज्येष्ठांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंदमेळ्यात वृद्धांसह त्यांच्या घरातील मुले, सुना, नातवंडेही सहभागी झाल्याने आनंदमेळ्याचा आनंद द्विगुणित झाला. श्रावण महिन्यातील हिरवळीवरील निसर्ग सहल, वनभोजन, आनंद मेळा, ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिलांच्या, सासू-सुनांच्या गमतीदार स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ या पंचरंगी कार्यक्रमाने ज्येष्ठांच्या उत्साहाला उधाण आले होते. ‘संध्या छाया भिवविती हृदया’ किंवा ‘आमचे आता काय राहिले- आमच्या गोवऱ्या म्हसनात गेल्या’ असे म्हणणाऱ्यांना वयाची आठवण राहिली नव्हती. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय झगडे, हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, मदन लोणारे, भूषण क्षत्रिय, अनिल दराडे, मनीष गुजराथी, डॉ. विजय लोहारकर, संजय सानप, सुरेश कट्यारे, त्र्यंबक खालकर, शुभांगी झगडे, तेजस्विनी वाजे, शकुंतला भगत, सुजाता लोहारकर, वैशाली सानप, उज्ज्वला खालकर, स्मिता थोरात, संगीता कट्यारे, शिल्पा गुजराथी, पूजा लोणारे, सुनीता दराडे, सुनील जोशी, शशिकांत देवळालीकर, कमल खर्डेकर, संपत जाधव, शंकर पारेगावकर आदिंसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून विजय लोहारकर, भानुदास माळी, हिरालाल कोकाटे, रघुनाथ सोनार, विठ्ठल केदार, अर्जुन गोजरे, लहानू गुंजाळ, दत्तात्रय ढोली यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी नियोजन केले. मु. शं. गोळेसर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
आनंदमेळ्यात ज्येष्ठ नागरिकांची धम्माल
By admin | Updated: August 14, 2016 01:06 IST