नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ७३ गटांपैकी ३४ जागा या अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी राखीव असताना त्या जागांमध्येही सर्वाधिक जागा शिवसेनेलाच मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण आरक्षणात २९ जागा अनुसूचित जमाती संवर्गासाठी, तर ५ जागा अनुसूचित जाती संवर्गासाठी पाच जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या ३४ जागांमधून शिवसेनेला सर्वाधिक १५ जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल कॉँग्रेस - ०७, राष्ट्रवादी कॉँग्रेस - ०६, भाजपा - ०४ व अन्य ०२ आदि जागांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती संवर्गातील २९ जागांमध्ये शिवसेनेला इगतपुरीतून नांदगाव सदो, खेड, शिरसाटे, दिंडोरी तालुक्यातून अहिवंतवाडी, कसबेवणी, मोहाडी, खेड, पेठ तालुक्यातून कोहोर व धोेंडमाळ, मालेगावमधून वडनेर, निफाडमधून कसबेसुकेणे, चांदवडमधून वडाळीभोई या जागा मिळाल्या आहेत. कॉँग्रेसला इगतपुरीतून वाडीवऱ्हे, बागलाणमधून ताहाराबाद, दिंडोरी तालुक्यातून उमराळे व कोचरगाव, त्र्यंबकेश्वरमधून अंजनेरी, कळवणमधून अभोणा, चांदवडमधून वडनेरभैरव अशा सात जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसला नाशिकमधून गोवर्धन व गिरणारे, कळवणमधून कनाशी, मानूर व खर्डेदिघर अशा पाच ठिकाणांहून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अनुसूचित जमाती संवर्गाचे सदस्य निवडून आले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून हरसूल व ठाणापाडा गटातून राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष व माकपा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. (प्रतिनिधी)
सेनेचीच ‘आघाडी’
By admin | Updated: February 25, 2017 01:29 IST