पाळे खुर्द : आडतीच्या प्रश्नावरून राज्यातील भाजीपाला व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तरी कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गोसराणे येथील बळीराम संतोष मोरे हा शेतकरी मात्र त्यास अपवाद ठरला आहे. पाच एकरातील कोबीचे पीक ऐन काढणीला आले असतानाच बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. यामुळे बळीराम मोरे यांच्यासमोर कोबी विक्रीचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, मात्र आलेल्या संकटाला न डगमगता बळीराम मोरे यांनी संपूर्ण कोबी स्वत:च विक्री करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेऊन मोरे यांनी आपला संपूर्ण कोबी एका ट्रकमध्ये भरून थेट मुंबईतील वाशी मार्केट गाठले आणि एकाच दिवसात अडीच लाखांची कमाई केली. खर्च वजा जाता त्यांना तब्बल दोन लाख २० हजारांचा नफा झाला. कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गोसराणे गावाचे शेतकरी बळीराम संतोष मोरे यांनी आपल्या पाच एकर शेतामध्ये कोबीचे पीक घेतले असून, सदर कोबी पीक काढणीला आले असतानाच शासनाने बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांकडून आडत न घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शेतकरी आपला शेतमाल कुठेही विक्री करण्यासाठी नियमनमुक्त केल्याने व्यापारी वर्गाच्या पोटात गोळा उठला व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र बाजार समिती बंदचे आंदोलन पुकारले. या संकटाला न डगमगता शेतकरी बळीराम मोरे यांनी आपला काढणीला आलेला कोबी स्वत: विक्र ी करण्याचा निर्णय घेतला. गोसराणे ग्रामपंचायतीची रीतसर परवागी घेऊन काढणीला आलेला कोबी ट्रकद्वारे नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात घेऊन गेले. वाशी येथे स्वत:च मालाची विक्री केली. ट्रकमध्ये दहा टन माल होता. सरासरी २७ ते २८ रुपये किलो भावाने त्यांनी कोबीची विक्र ी केली. (व्यापाऱ्याने २४ ते २५ रुपये किलो भावाने खरेदी केला असता ) संपूर्ण कोबी विक्रीतून मोरे यांना एकूण अडीच लाख रुपये रोख मिळाले. ट्रकचे भाडे, मजुरी व गोणी यांचा एकूण तीस हजारांचा खर्च वजा जाता त्यांना दोन लाख वीस हजार रुपये नफा झाल्याचे मोरे यांनी सांगितले . विशेष म्हणजे हमाली, दलाली व जकात असा कोणताही अतिरिक्त खर्च त्यांना द्यावा लागला नाही. वाशी बाजार समितीमध्ये जागा भाडे सुद्धा द्यावे लागले नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
एकाच दिवशी अडीच लाख रुपयांच्या कोबीची विक्री
By admin | Updated: July 14, 2016 01:43 IST