नाशिक : चॉकलेट घेऊन देण्याच्या आमिषाने लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयितास अवघ्या दोन तासात जेरबंद करून संशयितास अटक करण्याची कामगिरी मुंबई नाका पोलिसांनी केली आहे़ अपहृत मुलगी व आईची दोन तासांत भेट घडवून देणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले जात आहे़खोडेनगर परिसरात राहणाऱ्या वनिता पिंटू राऊत या महिलेची एक वर्षाची मुलगी पायल ही शनिवारी (दि़३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होती़ या दरम्यान, संशयित नितीन तानाजी गायकवाड (१९, रा़ सावित्रीबाई झोपडपट्टी, वडाळागाव, नाशिक) याने चॉकलेट देण्याच्या आमिषाने पळवून नेले़ वनिता राऊत यांना मुलगी पायल ही दिसत नसल्याने त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक मनीषा घोडके, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी सोनवणे, वाघ, डांगे, नाईक, शेख यांना खोडेनगर येथे रवाना केले़ या ठिकाणी गेल्यानंतर नित्या नावाच्या इसमाने पायलचे अपहरण केल्याची माहिती मिळाली़ यानंतर पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवून भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील व्हिडीओ गल्लीतून चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार नितीन गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पायलची सुखरून सुटका केली़ या अपहरणप्रकरणी संशयित नितीन गायकवाड याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
अपहृत मुलीचा अवघ्या दोन तासात शोध़़़
By admin | Updated: September 5, 2016 01:45 IST