नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने मंगळवार, दि. ३१ रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांनी वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दरम्यान, परीक्षांचा हंगाम असल्याने महापालिका हद्दीतील कोणत्याही शाळेला सुटी देण्यात आली नसल्याचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले. सरकारने आरक्षणासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही निर्णय दिला नसून, याबाबत दिलेल्या निवेदनाची सरकारला आठवण करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनात करण्यात येणार आहे. मराठा मूकमोर्चाप्रमाणेच आंदोलनात सर्वसामान्याला कोणताही त्रास होणार नाही याची दखल घेत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे. असे असले तरी शालेय विद्यार्थी वाहतूक बंद राहणार असल्याने विद्यार्थी पालकांना त्रास सहन करावा लागणार आहे. रस्ते बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत याची खबरदारी घेत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालक, मालकांनी वाहने रस्त्यावर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल होणार आहेत. दरम्यान, शालेय व्हॅन बंद असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आज शालेय विद्यार्थी वाहतूक बंद; शाळा मात्र सुरू
By admin | Updated: January 31, 2017 01:06 IST