नाशिकरोड : पळसे बंगालीबाबा दर्ग्यासमोरील प्रथम हिरा सेल्स या देशी-विदेशी दारूच्या गुदामाचे शटर उचकटवून अज्ञात तीन चोरट्यांनी सुमारे सव्वादहा लाख रुपये किमतीचे विदेशी दारूचे १३४ बॉक्स चोरून नेले.नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे बंगालीबाबा दर्ग्यासमोर प्रथम हिरा सेल्स प्रा. लि.चे देशी-विदेशी दारूचे गुदाम आहे. सोमवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे गुदाम बंद केले. मंगळवारी महाशिवरात्रीमुळे ‘ड्राय डे’ असल्याने गुदामालादेखील सुट्टी होती. दरम्यानच्या काळात अज्ञात तीन चोरट्यांनी रात्री गुदामचे शटर उचकटवून अॅन्टीक्युटी, डिप्लोमेट व्हिस्की आदि विविध कंपनीच्या व्हिस्की व रमचे दहा लाख २६ हजार ४५० रुपये किमतीचे १३४ बॉक्स आयशर किंवा टाटा ४०९ या गाडीत टाकून चोरून नेले. बुधवारी सकाळी गुदामाचे काम सांभाळणारे अनिल भटू चौधरी आले असता शटर उचकटलेले लक्षात आले. तीन चोरट्यांनी तब्बल ३५ ते ४० मिनिटे गाडी लावून दारूचे बॉक्स चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास चोरी केली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक मच्छिंद्र केकाण करीत आहे. (प्रतिनिधी)
सव्वादहा लाख रुपये किमतीचे विदेशी दारूचे बॉक्स चोरून नेले.
By admin | Updated: February 20, 2015 01:56 IST