नाशिक : घरात निघालेल्या नागराजाला बाटलीत बंद करण्यात यश मिळाले; मात्र मानवतेच्या भावनेतून या नागराजाला पाणी पाजणे जिवावर बेतल्याची घटना सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी दुपारी घडली़ या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूरच्या शिवाजीनगर परिसरातील निगळ पार्कच्या पाठीमागे अश्रू कचरू जाधव (५०) हे पत्नी व मुलासह राहतात़ रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अचानक नागराज अवतरले़ या नागराजाला अश्रू जाधव यांनी शिताफ ीने पकडून एका प्लॅस्टिकच्या बाटलीत जेरबंद करण्यात यशही मिळविले़ काही वेळाने या नागराजाला मानवतेच्या भावनेतून पाणी पाजण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिकच्या बरणीचे झाकण उघडताच नागराज फणा काढून थोडेसे बाहेर आले़ त्याच्या डोक्यावर पाणी टाकताच चवताळलेल्या नागाने जाधव यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ दंश केल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले़ या घटनेमुळे घाबरलेल्या जाधव यांच्या पत्नीने उपचारासाठी अश्रू जाधव यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले़ मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला़ या घटनेची गंगापूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
नागराजाला पाणी पाजणे बेतले जिवावर
By admin | Updated: May 27, 2014 16:59 IST