सोनांबे : मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे समाजात निर्माण होणारी अन्यायाची भावना व अस्वस्थता याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या शनिवारी (दि. २४) नाशिकमध्ये आयोजित समाजाच्या विशाल मोर्चात शेकडोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समाजाचे संघटन व नियोजन करण्याच्या हेतूने सोनांबे येथील हनुमान मंदिरात सर्वपक्षीय मराठा कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य केरू पवार, सरपंच पुष्पा पवार, भारतीय जनता पार्टीचे नेते रामनाथ डावरे, शिवसेना नेते बाजीराव बोडके, विकास संस्थेचे अध्यक्ष एम. डी. पवार, देवनदी पतसंस्थेचे अध्यक्ष भास्कर पवार, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, सोपान पवार आदि मान्यवर उपस्थित होते. कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना ताबडतोब फाशी द्या, मराठा समाजाला नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात योग्य ते बदल करण्यात यावे या समाजाच्या प्रमुख मागण्या असून, अत्यंत शांततेने व शिस्तीने कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)
सोनांबेत सर्वपक्षीय बैठक
By admin | Updated: September 23, 2016 00:44 IST