सटाणा : शहरातील प्रभाग ५ मध्ये वाडा, भाऊबंदकी याभोवती राजकारण फिरत असले तरी भिल्ल, आदिवासी मतदार कोणाला बळ देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.शहरातील प्रभाग ५ हा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी व खुला प्रवर्ग या दोन जागांसाठी राखीव आहे. हा प्रभाग उच्चभ्रूंपासून ते झोपडपट्टीत राहणाऱ्या मजुराचा रहिवास असलेला आहे. असे असले तरी आदिवासी बहुल परिसर आहे. या प्रभागातून खुल्या जागेसाठी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी करत आहेत. तर कॉंग्रेसकडून पालिका कामगार संघटनेचे नेते दिनकर रघुनाथ सोनवणे, भाजपकडून शिवाजी प्रभाकर सोनवणे, शहर विकास आघाडीकडून भास्कर (जीवन) बाबुराव सोनवणे, अपक्ष नंदिकशोर सुभाष सोनवणे यांच्यात पंचरंगी लढत रंगली आहे.पाचही उमेदवार मराठा समाजाची असली तरी वाडा, भाऊबंदकी मात्र वेगवेगळी आहे.पांडुरंग सोनवणे हे चौधरी वाड्यातले, दिनकर सोनवणे गोकुळ वाडा भाऊबंदकीतले, शिवाजी व नंदकिशोर सोनवणे हे पाटील वाड्यातले तर जीवन सोनवणे हे सुकदेव कृष्णा यांच्या वाड्यातले. भाऊबंदकीचा विचार केला तर पाटील वाड्याचे या प्रभागात प्राबल्य आहेत. तर दोन नंबर गोकुळ वाड्याची मते आहेत. या भाऊबंदकीच्या लढाईत आदिवाशींची एक गठ्ठा मते देखील निर्णायक मानली जात असून ते कोणाच्या पारड्यात आपली वजन टाकतात यावरच जय पराजय अवलंबून आहे. (वार्ताहर)
पंचरंगी लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष
By admin | Updated: November 16, 2016 23:33 IST