नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी नाशिकचे संतोष मंडलेचा यांची निवड करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात ते पदभार स्वीकारतील. वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुंबईचे अमित कामत यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चेंबर आॅफ कामॅर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी वरिष्ठ उपाध्यक्षांचीच वर्णी लागते. तसे संकेत आहेत. त्यामुळे त्यासाठी राबविली जाणारी निवड प्रक्रिया औपचारीकच असते. मंडलेचा हे चेंबरचे विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्ष असल्याने त्यांची निवड गृहीत धरली जात होती. शनिवारी मात्र नाशिकच्याच एका व्यावसायिकाने अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर माघार घेतली. मंडलेचा यांच्या निवडीची औपचारिकता शिल्लक होती. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी सागर नागरे यांनी मंडलेचा यांना अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे पत्र दिले. मंडलेचा हे नाशिकच्या रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्सचे, रिलायन्स इक्वीपमेंटसह विविध उद्योगांचे संचालक आहेत. निमा, आयमा, निवेक आदी संस्थांशी ते संबंधित आहेत. तसेच आयटीआय मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य, महानगर नियोजन समितीचे सदस्य, नाशिकरोड येथील जैन समाजाचे महामंत्री आहेत. मंडलेचा यांच्या रूपाने नाशिकला आठव्यांदा चेंबरचे अध्यक्षपद मिळाले आहे. यापूर्वी (कै.) बाबूभाई राठी, (कै.) अरविंद कुलकर्णी तसेच देवकिसन सारडा, खुशालभाई पोद्दार, विक्रम सारडा, हेमंत राठी, दिग्वीजय कापडिया यांनी हे पद भूषविले आहे. जून महिन्यात चेंबरच्या वार्षिक सभेत मंडलेचा यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी संतोष मंडलेचा
By admin | Updated: April 25, 2017 02:30 IST