नाशिक : शहरात डेंग्यू आजार पसरविणाऱ्या डासांनी उच्छाद मांडला असताना, पालिका मात्र दात कोरून पोट भरत आहे. डास प्रतिबंधक उपाययोजनांसाठी संपूर्ण शहरासाठी केवळ चारच फॉगिंग मशीन्स (डास पळविणारे धुरळणी यंत्र) आहेत अशी हतबलता आरोग्य विभाग करीत असताना, दुसरीकडे मात्र सतरा नव्या कोऱ्या फॉगिंग मशीन्स पालिकेच्या गुदामात धूळ खात पडून आहेत. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांच्या जिवाशी कशासाठी खेळत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून शहरात डेंग्यू पसरविणाऱ्या डासांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस तब्बल शंभर डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. पाठोपाठ चालू महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत ११० संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या ज्ञात माहितीशिवाय ही संख्या शेकडोंच्या घरात आहे. अनेकांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालेला असला, तरी पालिका ते मान्य करण्यास तयार नाही. डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर त्याठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात येते. संपूर्ण शहरात अशी मोहीम राबविण्याची गरज असताना, पालिका मात्र डास प्रतिबंधासाठी साधनसामग्री अपूर्ण असल्याचा दावा करते. २५९ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी केवळ चार फॉगिंग मशीन्स आहेत, असे पालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले होते. नागरी वसाहतीचा विचार केला तर सतरा लाख लोकसंख्येमागे अवघे चार मशीन्स कितपत पुरतील, असा प्रश्न आहे. पालिकेने मात्र यंत्रणा सक्षम करण्याऐवजी ज्या इमारतीत डास आढळतील तेथेच नागरिकांची बदनामी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तथापि, पालिकेच्या गुदामात पडलेले साहित्य लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेची किती बेफिकिरी आहे, हेच स्पष्ट होत आहे.द्वारका येथे पालिकेच्या गुदामात म्हणजेच साहित्य ठेवण्याच्या जागेत मात्र तब्बल १७ नव्या कोऱ्या फॉगिंग मशीन्स धूळ खात पडून आहेत. या मशीन्स खोक्यातून बाहेर काढण्याची तसदीही आरोग्य विभागाने घेतलेली नाही. इतकेच नव्हे, तर याठिकाणी दोन मोठ्या फॉगिंग मशीन्सदेखील आहेत. विशेष म्हणजे, याठिकाणी उपलब्ध कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी सर्व मशीन्स सुस्थितीत असल्याचे सांगितले. केवळ फॉगिंग मशीन्सच नाहीत, तर याठिकाणी डास प्रतिबंधक औषधांचा साठादेखील आहे. तो कितपत वापरला जातो ते माहिती नाही; मात्र मशीन्स धूळ खात पडून आहेत. पालिकेने या मशीन्स का दडवून ठेवल्या आहेत, याचे कोडे मात्र उलगडेनासे झाले आहे. (प्रतिनिधी)
सतरा फॉगिंग मशीन्स धूळ खातमहापालिकेची अशीही साठमारी :
By admin | Updated: November 12, 2014 00:25 IST