नाशिक : राज्य शासनाच्या कृषी विभागाची परवानगी नसताना जिल्'ात शेतकऱ्यांना अक्षरश: माती भरलेल्या गोण्यांतून उत्कृष्ट ‘भूसुधारक’ विकण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने उघड केला असून, दिंडोरीतील एका दुकानावर छापा टाकून तब्बल ५० गोण्यांचा साठा सील करून विक्री बंद आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी दिली. पुणे येथील वेरोनिक मॅनोसिक प्रा. लि., खोंडवा (पुणे) या कंपनीने दुय्यम भूसुधारकांची राज्य शासनाची परवानगी नसताना विक्री सुरू केली होती. नाशिक जिल्'ातही या कंपनीच्या दुय्यम भूसुधारकांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी १७ जुलै २०१४ रोजी नाशिक- कळवण रोडवरील दिंडोरी येथील वर्धमान फर्टिलायझर या खतविक्रेत्या दुकानावर छापा टाकून तपासणी केली असता त्यात शासनाची परवानगी असलेल्या दुय्यम भूसुधारक १०:५:१० व ८:६:६ व्यतिरिक्त पुण्याच्या संबंधित कंपनीचे ५:८:० या दुय्यम भूसुधारकाची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे १९८५ च्या खत नियंत्रण कायद्यानुसार परवानगी नसताना दुय्यम भूसुधारकाची विक्री करीत असल्याबाबत या दुय्यम भूसुधारकाच्या ५० गोण्यांची (किंमत प्रत्येकी सुमारे ५०० रुपये) विक्री गोठवून त्याचा साठा जप्त केला. तसेच या दुय्यम भूसुधारकांचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या नमुन्यांचा अहवाल आला असून, या दुय्यम भूसुधारकांत दर्शविल्यानुसार भूसुधारकाचे गुणवत्ता प्रमाण अक्षरश: ० व २.७० इतके आढळले.
मातीमोल भूसुधारकाची सर्रास ‘लाख’ मोलाने विक्री
By admin | Updated: November 21, 2014 00:06 IST