येवला : तालुक्यातील सायगाव येथे संपूर्ण कर्जमाफीसाठी येथील रोकडोबा पारावर कर्जमाफीचा ठराव करीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली.सततचा दुष्काळ, शेतपिकांना कमी बाजारभाव, हमीभाव नाही अशा अनेक संकटांनी येवला तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. डोक्यावर कर्ज, वीजबिल भरण्यासाठी पैसे नाही, कांद्याला हमीभाव नाही. उत्तर प्रदेशात योगी सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफ करतंय तर महाराष्ट्रात फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला टाळाटाळ करत आहे. यामुळे सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहचविण्यासाठी येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीने रोकडोबा पारावर सकाळी कर्जमाफीसंदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. सरपंच योगीता भालेराव अध्यक्षस्थानी होत्या. तालुक्यात मुख्य पीक कांदा असून, तो मातीमोल भावाने विकावा लागल्याने केलेला खर्चसुद्धा मिळाला नाही. उलट शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे कर्जमाफी करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन कर्जमाफीचा ठराव सर्वानुमते करण्यात आला व हा ठराव सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शेतकरी व ग्रामस्थ ग्रामसभेसाठी उपस्थित होते.यावेळी सरपंच योगीता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, सुनील देशमुख, गणपत खैरनार, दिनेश खैरनार, संगीता उशीर, सुनीता कोथमिरे, मीना खुरसने, मंदाकिनी भालेराव, प्रदीप दारुंटे, बाबूराव पठारे, भागुनाथ उशीर, संजय मिस्तरी, रघुनाथ खैरनार, बशीरभाई शेख आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
सायगावी कर्जमाफीचा ठराव
By admin | Updated: April 7, 2017 23:04 IST