पंचवटी : साईबाबा हे आमचे दैवत असून तथाकथित शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य करीत साईभक्तांच्या भावना दुखावित आहेत. यापुढे अशी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, त्याविरुद्ध आंदोलन करू आणि उज्जैन येथील कुंभमेळ्यात आपण आखाडा परिषदेचे अध्यक्ष असल्याचे त्यांना दाखवून देऊ असे प्रतिपादन ग्यानदास महाराज यांनी केले.शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी नाशिक येथे आल्यानंतर ग्यानदास हे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना ग्यानदास बोलत होते. ग्यानदास म्हणाले, साधू संत प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश बघतात. त्याला शंकराचार्य सरस्वती अपवाद आहेत. ते केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठीच साईबाबांवर आरोप करतात. साईबाबांच्या दर्शनाने कुणाचे भले झाले नाही असे म्हणणाऱ्या शंकराचार्यांनी आधी त्यांच्या दर्शनाने कुणाचे भले झाले आहे हे जाहीर करावे आणि साईभक्तांच्या भावनांशी खेळणाऱ्या संविदानंदांनी त्यांचे मठ बांधण्यासाठी पैसा कोठून येतो हेदेखील जाहीर करावे असे आव्हान दिले. केवळ आखाड्यांमध्ये वाद निर्माण करण्यासाठीच स्वरूपानंद आपल्या अध्यक्षपदाचा वाद निर्माण करीत आहेत. मुळात शंकराचार्यांचा आखाड्यांशी संबंध येत नाही. आखाडा परिषदेचे ते पदाधिकारीही नाहीत, त्यामुळे त्यांनी आमच्यात सहभागी होऊ नये. न्यायालयाच्या आदेशनंतर ते शंकराचार्य झाले आहेत, प्रयागमध्येही त्यांच्यावर परिषदेने बहिष्कार टाकला होता याची जाणीव त्यांनी ठेवावी असे सांगतानाच आपल्या अध्यक्षपदाचे प्रमाण त्यांना उज्जैनच्या कुंभमेळ्यात देऊ असेही ग्यानदास म्हणाले. नरेंद्रगिरी हे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नाहीत. त्यांची कोणत्याही पदावर नियुक्ती झालेली नाही, त्यामुळे अध्यक्ष होऊ शकत नाहीत, असे सांगतानाच नरेंद्रगिरींनी संपत्ती विकून गाडी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. (वार्ताहर)
साईबाबा हे आमचे दैवतच
By admin | Updated: July 30, 2015 00:17 IST