नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याची लागवड तिप्पट क्षेत्रावर झाल्याने आणि त्या तुलनेतच लाल पोळ कांदा बाजारात आल्याने कांद्याच्या दरात गेल्या १५ दिवसांत प्रचंड घसरण झाली असून, या १५ दिवसांत कांद्याचे भाव क्विंटलमागे १५०० रुपयांनी कोसळल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यासंदर्भात जिल्ह्याचे तीनही खासदार, माजी पालकमंत्री यांनी संसदेत व विधानसभेस लक्षवेधी मांडण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तूर्तास चीन, बांगलादेश आणि पाकिस्तानचा कांदा बाजारात अडीचशे ते पावणे तीनशे डॉलरला असताना भारतीय कांद्याचे निर्यातमूल्य मात्र ७०० डॉलरचे असून, हे निर्यातमूल्य तात्काळ कमी करून कांद्याची निर्यात सोपी केल्यास कांद्याचे कोसळलेले भाव स्थिर होण्यास मदत होईल, असे पाटील यांनी सांगितले. कांद्याचा सरासरी एकरी उत्पादन खर्च ८० हजारांच्या घरात असून, कांद्याचे दर दिवसागणिक कोसळत असून, गेल्या पाच दिवसांत ५०० रुपयांनी कोसळले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांना नफा सोडाच उत्पादन खर्चही मिळतो की नाही, ही शंका असून, त्यासाठी शासनाने कांद्याला एक निश्चित हमीभाव ठरवून दिला पाहिजे. कांद्याचे मागील हंगामातील दर तर ३०० ते ६३०० रुपये प्रति क्विंटल असे शेअर मार्केटसारखे कधीही उसळी घेणारे आणि कधीही कोसळणारे असल्याने कांद्यासाठी शासनाने कायमस्वरूपी एक निश्चित धोरण व रणनीती ठरविली पाहिजे. कांदा उत्पादकांना तीच खरी मदत ठरू शकेल. १५ दिवसांपूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटलला २६०० रुपये असताना ते सोमवारी (दि.७) ११०० रुपये इतके झाले होते. तत्पूर्वी शनिवारी (दि.५) भाव १६०० रुपये असताना पाच दिवसांत ११०० रुपये झाले आहेत. जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळण्याने वणी, दिंडोरी, चांदवड, लासलगाव, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज कांदा उत्पादकांनी बंद पाडले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ हमीभाव घोषित केला पाहिजे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील वर्षी एकूण आवकेच्या विक्रीतील केवळ ६.३० टक्केकांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळाला, तर एकूण २७.८४ टक्केकांदा उत्पादकांनी उत्पादन इतक्याच भावात कांदा विक्री केल्याचे नानासाहेब पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तिप्पट लागवड लेट खरिपाच्या २६,५३२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा ६९,८४७ हेक्टरवर लागवड झाली आहे. तसेच उन्हाळी कांद्याचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ४0 हजार ४२२ हेक्टर असताना २ डिसेंबरअखेर २४ हजार ३७२ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पट कांद्याची लागवड करण्यात आल्यानेच कांद्याचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त होऊन भाव कोसळले असल्याचे पाटील यांनी सांगितले.