वडनेरभैरव : परिसरातील नागरिकांना नवीन रेशनकार्ड, गॅस आदिंसाठीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी बँक, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.शासकीय आदेशान्वये नवीन शिधापत्रिकेसाठी रहिवासी दाखला, प्रत्येक व्यक्तीचे आधारकार्ड, बँक पासबुक, जुनी शिधापत्रिका या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून संबधितांकडे जमा करावी लागत असून, हे सर्व होत नाही, तर गॅस कंपनीने यात अजून भर टाकत बँक खाते हे पती-पत्नीचे संयुक्त पाहिजे असे सांगितले. या सर्व प्रकाराने ग्राहक मेटाकुटीस आला आहे. पंतप्रधान जन-धन योजनेत अनेकांनी बँकांमध्ये खाते उघडले. परंतु ते एका व्यक्तीचे असल्याने हे खाते चालणार नाही. संयुक्तच खाते असावे, असा दंडक असल्याचे गॅस वितरण कंपनी सांगत आहे. वडनेरभैरव येथे एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेत कर्जदार, ठेवीदार ग्राहकांची गर्दी असते त्यात जन-धन योजनेमुळे अजून गर्दी होत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. नाशिक जिल्हा बँकेत पेन्शनधारक, शेतकरी, ग्राहक असे सर्व खातेदार असताना फक्त राष्ट्रीयकृत बँक हवी हा अट्टहासामुळे बॅँकेत गर्दी होत आहे. गॅस कार्डसाठी ज्या बँकेत ग्राहकांचे खाते आहे ते ग्राह्य धरावे, अशीही मागणी होत आहे. (वार्ताहर)
विविध शासकीय कागदपत्रांसाठी वडनेरभैरव परिसरात धावपळ
By admin | Updated: January 1, 2015 00:33 IST