नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या बदलीच्या आणि नंतर बदली रद्दच्या अफवांनी काल (दि. १९) दिवसभर जिल्हा परिषदेत अफवांचा बाजार गरम झाल्याचे चित्र होते.विशेष म्हणजे सुखदेव बनकर रुजू होण्यापूर्वी पहिल्यांदा या जागेवर बदली झालेले दीपक चौधरी यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर काही तासांतच वेगाने चक्रे फिरून चौधरी रुजू होण्यापूर्वीच औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी २०१३ च्या आॅक्टोबरमध्ये बदली झाली होती. बदली होऊन जेमतेम वर्ष होत नाही तोच जानेवारी २०१५ मध्ये सुखदेव बनकर यांची राज्यातील सत्ता बदलानंतर पुन्हा बदली होऊन त्यांच्या जागी अजित चौधरी यांची नाशिकला बदली झाली होती. अजित चौधरी पदभार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेत आलेही होते. मात्र दरम्यानच्या काळात वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली व पुन्हा अजित चौधरी यांना दीपक चौधरी यांच्याप्रमाणेच उलट पाऊली परत फिरावे लागले होते. त्यावेळी सुखदेव बनकर यांची बदली रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकासमंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्याचे कारण देत ही बदली रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी जानेवारीत सुखदेव बनकर यांच्या बदलीस स्थगिती दिली होती. आताही सुखदेव बनकर यांची बदली झाल्यानंतर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर पदभार स्वीकारणार म्हणून दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत तयारी सुरू होती. प्रत्यक्षात काल (दि. १९) दिवसभर पुन्हा एकदा सुखदेव बनकर यांची बदली रद्द झाल्याची चर्चा होती. तर काहींच्या मते नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर हे सोमवारी (दि. २३) पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
बदलीवरून जिल्हा परिषदेत ‘अफवांचा’ बाजार गरम
By admin | Updated: November 19, 2015 23:54 IST