नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारे भाविकांसोबत ‘अतिथी देवो भव:’ या उक्तीप्रमाणे रिक्षा व टॅक्सी चालकांचे वर्तन असले पाहिजे़ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या प्रवाशांसोबत केलेले चुकीचे वर्तन हे नाशिकची प्रतिमा खराब करणारे असेल़ त्यामुळे नाशिकचे नाव चांगल्या अर्थाने मोठे करण्याची सुवर्णसंधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याकडे चालून आली आहे़ या संधीचे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी व बसचालकांनी सोने करावे असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी ‘सौजन्य अभियान’ उद्घाटन प्रसंगी केले़सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली शाही पर्वणी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे़ यासाठी जगभरातून भाविक नाशिकला येणार असून रिक्षाचालकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे़; मात्र प्रवाशांची लूट करून उत्पन्नात वाढ होणार असेल तर ती नाशिकची प्रतिमा खराब करणारी असेल़ त्यामुळे रिक्षा-टॅक्सी व बसचालकांचे प्रबोधन व्हावे यासाठी आरटीओ विभागाने ‘सौजन्य अभियान-२०१५’ ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे़ या अभियानाचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांच्या हस्ते झाले़ यासाठी एका आयशर गाडीवर फलक लावण्यात आला असून ही गाडी नाशिक शहर व त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक व मालकांचे प्रबोधन करणार आहे़ शहरात पुढील पाच दिवस ही गाडी फिरणार आहे़ या उद्घाटनप्रसंगी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, सह प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मंडोरा, सुदाम सूर्यवंशी, जी़ डी़ डगळे, अविनाश राऊत, अतुल चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
आरटीओच्या ‘सौजन्य अभियानास’ प्रारंभ
By admin | Updated: August 20, 2015 00:11 IST