आरटीई कायद्यानुसार कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये पहिलीच्या पटाच्या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला- मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या जागांवर प्रवेशासाठी आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना २१ मार्च २०२१ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागील वर्षाप्रमाणेच एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. तर शाळेत आरटीईअंतर्गत उपलब्ध जागांएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ही प्रक्रिया राबविताना पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना सर्व माहिती योग्य असल्याशिवाय अर्ज कन्फर्म करू नये. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी आरटीई प्रवेशप्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याचेही सुनिता धनगर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आरटीईअंतर्गत प्रवेश करून देतो असे सांगून पालकांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे पालकांनी केवळ शासनाच्या नियमावलीनुसार प्रवेशप्रक्रियेला सामोरे जावे तसेच अर्जात पत्ता व स्वतःच्या घराचे गुगल लोकेशन अचूक टाकावे. शाळा व घर यांच्यातील अंतराची मर्यादा विचारात घेऊन शाळाची निवड करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
पालकांसाठी दोन मदत केंद्र
सायबर कॅफेत अर्ज भरताना बऱ्याच चुका होत असल्याचे निदर्शनास येते असल्याने मनपा शिक्षण विभागाने दोन मदत केंद्र सुरु केली आहेत. यात पोलीस आयक्तालयामागील भागात समग्र शिक्षा अभियान कार्यालय, नागरी साधन केंद्र क्रमांक १ व सेंट झेवीयर स्कूलच्या मागे जय भवानी परिसरात समग्र शिक्षा अभियान, नागरी साधन केंद्र क्रमांक - २ या केंद्रांचा समावेश आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला तसेच विदयार्थी दिव्यांग / एचआयव्ही बाधित असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.