नाशिक : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर कमी असल्याचा सरकारचा दावा साफ खोटा असून, अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील डिझेलचे दर जास्त असल्याने डिझेलच्या विक्रीत गेल्या दहा दिवसांत ४० टक्के घट म्हणजेच एक हजार कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने केला आहे. तसेच यासंदर्भात येत्या १३ आॅक्टोबरला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून, बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास त्याच दिवशी बेमुदत बंदची तारीख जाहीर करण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक शनिवारी नाशिकला झाली. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पेट्रोल-डिझेलवरील करासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी संघटनेची बैठक होती. बैठकीत राज्य सरकारकडे मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आल्याचे अध्यक्ष उदय लोध व प्रवक्ते सागर रुकारी यांनी सांगितले. संघटनेची प्रमुख मागणी एक राज्य एक कर, ही असून राज्य सरकारने फक्त ९ टक्के व्हॅट कराची आकारणी करावी, त्यामुळे राज्यातील जनतेला किमान पाच ते सहा रुपयांनी पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप बूब, जिल्हाध्यक्ष शंकरराव टाकेकर, विजय ठाकरे, नितीन धात्रक आदिंसह २१ जिल्ह्यांतील १३६ प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दोन रुपयांच्या करासाठी एक हजार कोटींचे नुकसान
By admin | Updated: October 11, 2015 00:08 IST