नाशिक : रोटरी ग्लोबल ग्रांटच्या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ नासिक आणि अमेरिकेच्या रोटरी क्लब ऑफ कोविंग्टन आर.आय डी ६८४० (अमेरिका) यांनी एकत्र येऊन नाशिकमधील हृदयरोग्यांसाठी अनोखे पाऊल पुढे टाकले आहे. नाशिक हृदयमित्र सेवाभावी संस्था व चोपडा मेडिकेअर प्राईव्हेट लिमिटेड यांना डिजिटल कार्डिओलॉजी व अँजिओग्राफी सिस्टीम असलेले अद्यावत असे स्वयंचलित मशीन प्रदान करण्यात आले असून या मशीनद्वारे पुढील ५ वर्षांत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
हृदयविकार जन्मताच असतील किंवा लहान मुलामध्ये असल्यास त्यांच्यावर उपचार करणे अतिशय गुंतागुंतीचे व जिकीरीचे काम असते. या सेवेसाठी चोपडा मेडिकेअर सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन डॉ मनोज चोपडा यांनी दिले. या सुविधेमुळे नाशिकमधील तसेच नाशिकजवळील गावामधील गरजूना आता मोठ्या शहरात उपचारासाठी जावे लागणार नाही , पैसे व वेळ वाचेल आणि रुग्णाला त्वरित उपचार मिळाल्याने असे रुग्ण लवकर पूर्ण बरे होतील यात शंका नाही. या ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट साठी रोटरी क्लब ऑफ नासिकचे विवेक जायखेडकर, उदयराज पटवर्धन, रवी महादेवकर, अजय नरकेसरी, मनीष चिंधडे , मुग्धा लेले , डॉ. श्रीया कुलकर्णी आणि डॉ मनोज चोपडा यांनी विशेष परिश्रम घेतले.
इन्फो
बालकांसाठी वरदान
या अत्याधुनिक मशीनच्या साह्याने लहान मुलांमधील विशेषत्वे अर्भक ते बारा वर्षे वयोगटातील लहान मुलांमधील हृदयविकाराचे योग्य निदान होऊन त्यावर वेगाने उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिकने कॅथ लॅब प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करून नाशिककरसाठी मोठी सोय केली आहे अशी सुविधा असलेले नाशिक हे देशामधील मोजक्या शहरांमधील एक शहर झाले आहे.