नाशिक : महामार्गावरून प्रवास करणे असुरक्षित होत असून, लूटमार करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाडीवऱ्हेजवळ एका ट्रकचालकास बेदम मारहाण करून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.कोंडा घेऊन घोटीकडे जाणारी ट्रक (एमएच१५ एजी ५५९९) मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास नादुरूस्त झाली. नेमका याचाच फायदा घेत महामार्गावर लूट करणाऱ्या लुटारूंनी ट्रकचालक शाहीद शब्बीर शेख (४०, रा.पिंपळनेर, ता.साक्री) व त्यांचा पुतण्या इमरान शेख (२५) यांना जबर मारहाण करून वीस हजार रुपयांचा ऐवज लूटन नेला. काका-पुतणे हे ट्रक पंक्चर झाल्यामुळे चाक खोलून बदली करत होते. दरम्यान, चोरट्यांच्या टोळक्याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी चौघांनी ट्रकमधील लोखंडी सळी काढून त्याने मारहाण केल्याने दोघे गंभीर जखमी झाले. ट्रकचालकाच्या खिशातील पंधरा हजार रुपये, चार हजार किमतीचे दोन भ्रमणध्वनी असा एकूण वीस हजाराचा ऐवज लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
वाडीवऱ्हेला ट्रकचालकाची लूट
By admin | Updated: October 4, 2015 00:13 IST