नाशिक : शहरातील पंचवटी, आडगाव, कोणार्कनगर परिसराला घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. पंधरवड्यापासून सातत्याने या भागात घरफोडीच्या घटना घडत असून, दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच आडगाव, पंचवटी व सरकारवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन अशा सहा घरफोड्यांच्या घटनांमधून लुटारुंनी सुमारे सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह साडेआठ लाखांचा ऐवज लुटून पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राजरोसपणे घरफोड्यांसह वाहनचोरी, सोनसाखळी पळविणे यासारख्या गुन्हेगारीच्या घटना नित्यनेमाने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिक मूळ गावी रवाना होत असल्याचा फायदा घेत विविध सोसायट्यांमधील बंद सदनिकांना चोरटे लक्ष्य करत आहेत. शहरात विविध भागांमध्ये घडणाऱ्या घरफोड्यांच्या घटनांवरून मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. पंचवटी ते कोणार्कनगर, अमृतधाम परिसरात बहुसंख्य नागरिक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले असून, सणासुदीच्या काळात या भागातील बहुसंख्य रहिवासी आपल्या मूळ गावी कुटुंबासमवेत रवाना होत असल्याने घरफोडी करणाऱ्या टोळीचे फावले आहे. यामुळे पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे आव्हान उभे राहिले आहे. (प्रतिनिधी)
साडेआठ लाखांचा ऐवज लुटून पोबारा
By admin | Updated: October 23, 2015 00:25 IST