इगतपुरी : पूर्वभागातील अनेक विहिरींनी गाठला तळबेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. निसर्गसौंदर्य व परिपूर्णता तालुक्यास लाभूनही धरणांतील पाण्यावर शेतकऱ्यांना आपला हक्क सांगता येत नाही. परिणामी एवढा पाऊस होऊनही थेंबभर पाण्यासाठी भटकणे सर्वसामान्यांच्या नशिबी आहे.तालुक्यात यंदा जास्त पाऊस होऊन सर्व धरणे व छोटे-मोठे नदी-तलाव भरले होते. मात्र फेब्रुवारीतच काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. परिसराला पिण्याचे पाणी व चाऱ्यासाठी पाणी पुरविणाऱ्या मुकणे धरणाखालील अस्वली स्टेशन येथील ओंडओहोळ या नदीपात्राला पाणी आवर्तन नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचविणे अवघड होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी पाणी नियोजन बैठकीत १२५ दशलक्ष घनफूट पाणी दारणा डोहापर्यंत मंजूर असूनदेखील त्यांना हक्काचे पाणी मिळेनासे झाले आहे. तसेच एकूण पाच आवर्तने मंजूर आहेत. त्यातील एकच आवर्तन गेल्या महिन्यात सोडले होते. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाणी आवर्तन न सोडल्यास संतप्त शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतील, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे, बंशी पाटील पागेरे, गोकुळ गुळवे, काशीनाथ तांबे, शिवाजी गुळवे, राजाभाऊ गव्हाणे, भोर, बाळू यंदे, तुकाराम गायकर, बाळू आमले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
थेंबभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती
By admin | Updated: March 23, 2016 22:27 IST