नाशिक : केंद्रीय वाहतूक मंत्रालय दिल्ली व कॉलेज आॅफ ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि नाशिक पोलिसांच्या सहकार्याने पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी व खासगी चालकांना देण्यात येणाऱ्या ‘रोड टू सेफ्टी’च्या दोनदिवसीय प्रशिक्षणास सोमवारपासून प्रारंभ झाला.सोमवारी सकाळी दहा वाजता गंगापूररोडवरील नूतन पोलीस आयुक्तालयातील सभागृहात पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. याबरोबरच सुयश हॉस्पिटलजवळील ट्रॅफिक पार्कमध्ये वाहतूक पोलीस तसेच विविध चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात कॉलेज आॅफ ट्रॅफिक मॅनेजमेंटचे रोहित बलुजा, इंदरपालसिंह मकैजा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाहतूक पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे, मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे होणाऱ्या घटनांवर नियंत्रण आणणे, खासगी व व्यावसायिक वाहनांच्या चालकांना प्रशिक्षण देणे, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा या प्रशिक्षणाचा उद्देश असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले़ या प्रशिक्षण कार्यक्रमात वाहतूक विभागाचे अधिकारी, ६० पोलीस कर्मचारी, व्यावसायिक चालक अशा ७५ जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस उपआयुक्त एन. अंबिका, श्रीकांत धिवरे, पंकज डहाणे, वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत वाघुंडे, पोलीस निरीक्षक गाडे, लोहकरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रोड टू सेफ्टी’ प्रशिक्षणास सोमवारपासून प्रारंभ
By admin | Updated: June 12, 2015 01:24 IST